Breaking News

 

 

कळंब्यात मटका, बेटींग अड्ड्यावर छापा : तिघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा (ता.करवीर) येथील हयात कॉलनीतील बंगल्यामध्ये मटका अड्डा तसेच क्रिकेट बेटींगचा जुगार अड्डा चालवणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने काल रात्री उशीरा अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट, तीन मोटरसायकली यासह एकुण २,७६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक तानाजी सावंत यांना माहिती मिळाली की, उमरफारुख शेख (रा. प्लॉट नं. A-5, हयात कॉलनी, कळंबा) याच्या बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर फिरोज शेख (रा. नायकवडी गल्ली, कागल) हा काही लोकांसोबत जुगार अड्डा तसेच क्रिकेट बेटींग अड्डा चालवीत होता. उपनिरिक्षक दादाराजे पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी रात्री १०.४० च्या सुमारास तेथे छापा टाकला. यावेळी फिरोज शेख, सचिन गिरी (वय २८, रा. कागल), प्रकाश सुतार (वय ३८, रा. वंदूर ता. कागल) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून रोख ६८,२००, ७१,००० रुपयांचे अकरा हँडसेट, कलर प्रिंटर, एलईडी टिव्ही, तीन मोटरसायकली, सेटअप् बॉक्स आदी एकुण २,७६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फिरोज शेख याने दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील संजय तेलनाडे हा या अड्ड्याचा मुख्य मालक आहे. तसेच क्रिकेट बेटींग कर्नाटकातील विजापूरातील नूर सय्यद याच्या सांगण्यावरुन घेण्यात येत होते.

ही कारवाई हेड कॉ. संदीप कुंभार, अमोल कोळेकर, राजेंद्र हांडे, प्रकाश संकपाळ, नितीन चोथे, उत्तम सडोलीकर, जितेंद्र भोसले, संतोष पाटील यांनी पो.नि. तानाजी सावंत, स.पो.नि. दादाराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

1,248 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *