राशिवडे (प्रतिनिधी) : राज्य सरकारने जाहीर केलेला ‘आनंदाचा शिधा’ दिवाळी संपत आली तरी राधानगरी तालुक्यामध्ये पोहोचला नसल्याने शिधापत्रिकाधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ग्रामस्थ ‘आनंदाचा शिधा’च्या प्रतीक्षेत आहेत.

शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ मध्ये प्रत्येकी एक किलोप्रमाणे रवा, चणाडाळ, साखर आणि तेल असे दिवाळीसाठी लागणारे जिन्नस फक्त शंभर रुपयात देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यामुळे महागाईचे दिवस असूनही सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, पण दिवाळी संपत आली तरी अजूनही जाहीर केलेले दिवाळीचे पॅकेज मिळालेले नाही. यामुळे राज्य शासनाचे ढिसाळ नियोजन समोर आले आहे. राधानगरी तालुक्यातील शिधापत्रिका धारकांना सरकारकडून मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ आधी मिळणार, असा प्रश्न विचरला जात आहे.

राधानगरी तालुक्यामध्ये एकूण १२० हून अधिक रास्त भाव धान्य दुकान केंद्रे कार्यरत आहेत. त्या अंतर्गत तालुक्यात एकूण ३३३०० लोकांना ‘आनंदाचा शिधा’ किट वाटप करण्यात येईल, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. दिवाळी संपत आली तरी चारपैकी रवा आणि पामतेल हे दोनच जिन्नस उपलब्ध झाले आहेत. राहिलेले साखर आणि चणाडाळ हे दोन जिन्नस केव्हा येतील हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जाहीर केलेले पॅकेज आता फक्त फॉर्मलिटी म्हणूनच द्यावे लागेल. फक्त राधानगरी तालुक्यातच अशी परिस्थिती नाही तर आजरा, चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज अशा तालुक्यांमध्येही अजून ‘आनंदाचा शिधा’ वाटप केलेला नाही.