भारतीयांचा आवडता सण असलेल्या दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. सोबतच फटाके देखील फोडले जातात. अनेक शतकांपासून विविध देशांत सण-उत्सवाच्या काळात फटाके उडवले जातात.

भारतामध्ये मुघलांबरोबर गनपावडरचे आगमन झाले. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये गनपावडर आणि तोफांचा वापर करण्यात आला होता. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर म्हणजेच १५२६ नंतर भारताला गनपावडरची माहिती झाली. तेव्हापासूनच भारतीयांना फटाक्यांची ओळख झाली. अकबराच्या काळात विवाह आणि उत्सवांमध्ये फटाक्यांचा वापर होऊ लागला. ज्या गनपावडरपासून फटाके तयार होत, ती महाग होती. म्हणून फटाके हे प्रतिष्ठेशी जोडले गेले.

भारतामध्ये आधुनिक फटाके बनवण्याचे काम ब्रिटिश सरकारच्या काळात कलकत्त्यात सुरु झाले. १९ व्या शतकात फटाके बनवण्यासाठी एका लहान मातीच्या भांड्याचा वापर होत असे. त्यात गनपावडर टाकून ते जमिनीवर आपटले, की त्यातून प्रकाश आणि आवाज बाहेर पडायचा. कदाचित त्यामुळेच त्याला फटाका असे नाव मिळाले असावे. तेव्हा त्याला भक्तापू किंवा बंगाल लाइट्स असे म्हणत. त्यामुळेच ब्रिटिश सरकारच्या काळात बंगाल हे उद्योगाचे केंद्र होते. तिथे माचिसची फॅक्टरी होती. त्यामध्ये गनपावडरचा वापर केला जात असे. त्यामुळे तिथेच आधुनिक भारतातला पहिला फटाका कारखाना स्थापन झाला. हा कारखानानंतर तामिळनाडूमधल्या शिवकाशी येथे हलवण्यात आला. सध्या तामिळनाडूमधील शिवकाशी हे भारतात फटाके बनवणारे सर्वात मोठे केंद्र आहे.

भारतात मराठी संतसाहित्यामध्ये मराठी संत कवी एकनाथ यांनी १५७० मध्ये लिहिलेल्या पुस्तकातील एका कवितेत महाभारत कालखंडात रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णाच्या विवाहावेळी फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतातील फटाक्यांचा इतिहास १५ व्या शतकापेक्षाही जुना आहे.

फटाक्यांचा शोध हा चीनमध्ये लागल्याचं इतिहासकार सांगतात. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात एका दुर्घटनेपासून फटाक्यांचा शोध लागल्याचं मानलं जातं. एका आचाऱ्याने जेवण बनवताना चुकून पोटॅशियम नायट्रेट आगीत टाकलं. त्यामुळे त्यातून रंगीबेरंगी ज्वाळा निघाल्या. त्यानंतर पोटॅशियम नायट्रेट, कोळसा आणि सल्फरची पूड तयार करून त्याने ती आगीत टाकली. त्यामुळे जोरदार स्फोटाचा आवाज झाला, पण रंगीबेरंगी ज्वाळा निर्माण झाल्या नाहीत. फटाके आणि त्याच्या दारूचा शोध यावेळी लागला.

कोळसा व पोटॅशियम नायट्रेटच्या माध्यमातून गनपावडर म्हणजेच दारू बनवाण्यात आली आणि सूर्यकिरणांच्या उष्णतेमुळं तिचा स्फोट झाला. त्यानंतरच्या काळात बांबूच्या नळीत ही पावडर भरून स्फोट करण्यासाठी वापरली जाऊ लागली. यावरून असे कळते की, बांबूचा वापर फटाके निर्मितीसाठी केला जात होता. २२०० वर्षांपूर्वी चिनी लोक बांबू आगीत टाकत. तापल्यानंतर तो फुटत असे. याच्या आवाजामुळे नकारात्मक विचार, वाईट आत्मा दूर जाऊन सुख-शांती प्राप्त होते, असे चिनी लोक मानत होते. त्यामुळे त्याचा वापर सणासुदीच्या काळात, नववर्ष स्वागतावेळी, जन्मप्रसंगी, विवाहावेळी यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक, मनोरंजन अशा विविध कार्यक्रम,  क्रीडा क्षेत्रातील यशाबद्दल फटाक्यांची मोठा प्रमाणावर आतषबाजी केली जाते.