मेलबर्न : भारताकडून झालेला हा पराभव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पचवता आलेला नाही. त्याने थेट भारताला आव्हान दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा सामना होईल. त्या सामन्यामध्ये पाकिस्तान भारतावर हमखास विजय मिळवेल, असे शोएब अख्तर म्हणाला.

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत शोएब अख्तरने भारताने आपला विजय वाया घालवू नये, असा एक सल्ला दिला आहे. ‘हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी भरपूर मुले आली होती. त्यांनी चांगला क्रिकेट सामना पाहिला. सोशल मीडिया लहान मुले सुद्धा पाहतात. त्यामुळे वाईट गोष्टींसह हा विजय वाया घालवू नका, असे मी हिंदुस्थानला आवाहन करतो, असे  शोएबने या व्हिडिओत म्हटले आहे.

‘पाकिस्तानने चांगली कामगिरी केली. ज्या विकेटवर चेंडू समजत नव्हता, तिथे पाकिस्तानने १६० धावा केल्या. मधली फळी परिपक्वता दाखवू शकली नाही. भारताला या विजयाच्या शुभेच्छा. भारताने या विश्वचषकमध्ये एक मॅच जिंकली आहे, पाकिस्तानने एक सामना गमावलाय. पुन्हा एकदा भारताशी सामना होईल. त्यावेळी आम्ही भारताला हरवू’ असे शोएबने म्हटले आहे. ‘विश्वचषक स्पर्धेची शानदार सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तानचा सामना होतो, त्यावेळी क्रिकेट विश्वचषक सुरु होतो. माझ्यासाठी तर आजपासून विश्वचषक सुरु झाला आहे,’ असे शोएब अख्तरने म्हटले आहे.