गगनबावडा (प्रतिनिधी) : दुर्गम डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या, कष्टप्रत जीवन जगणाऱ्या, शहरी भागापासून कोसो दूर असणाऱ्या बावेली-काटेवाडी वस्तीवरील धनगर बांधवांसोबत सह्यगिरी परिवाराने आनंदाची दिवाळी साजरी करून माणुसकीचे दर्शन घडविले. सह्यगिरी कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक विचारमंच, ता. गगनबावडा यांनी बावेली काटेवाडी (धनगरवाडा) ता. गगनबावडा येथे राबविलेल्या ‘एक पणती माणुसकीची’ या उपक्रमाचे हे पाचवे वर्षे होते.

वस्तीवरील घरात दारोदारी रांगोळी काढून आकाश कंदिलांचे तोरण बांधून गावकऱ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवत निसर्गरम्य ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. धनगर माता-भगिनींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

सह्याद्री परिवाराकडून वस्तीवरील सर्व महिला, पुरुष, मुले यांना नवी कपडे देण्यात आले. घरोघरी दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे तसेच दिवाळीचे साहित्य वितरण करण्यात आले. दिव्यांग आजोबांना वॉकर व कुबड्या भेट देताना सर्वांनाच गहिवरून आले. बहिणबीज साजरी करून महिलांना साडी चोळी ओटी व जोडली भेट देण्यात आली यासाठी आनंदा बोगरे सुळेकर, कृष्णात पाटील, सुभाष मोळे, देसाई परिवार यांचे सहकार्य लागले.

यावेळी संगीतमय दिवाळी आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील बॅन्जो वादक महादेव गुरव, सॅक्सोफोन वादक कदम, उत्तम निवेदक लंबे, बासरी वादक एकनाथ चौगुले यांनी सुरतालातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. गावगाडा फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल कांबळे यांचे सहकार्य लाभले. चित्रकार विनायक पोतदार, शिल्पकार शैलेश पाटील व्यक्तीचित्रकार खुपीरेकर निसर्ग चित्रकार भाऊसो पाटील यांनीचित्र शिल्प प्रात्यक्षिकांचे उत्कृष्ट नमुने दाखविले.

कार्यक्रमासाठी गगनबावडा तालुक्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, महापालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार तसेच पेटाळा डी. एड. कॉलेजचे माजी प्राचार्य प्रभाकर हेरवाडे न्यायाधीश एकनाथ चौगले, उद्योगपती सर्जेराव शिंदे सरपंच कमल काटे व विविध संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, बँक अधिकारी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक सह्यगिरी, युवा परिवार महिला, परिवारचे संघटक  कोल्हापूर सांगली, इचलकरंजी, गारगोटी, कोल्हापूर येथून सह्यगिरी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.