Breaking News

 

 

नवीन शिवाजी पुलाचे काम बंद पडू देणार नाही : खा. संभाजीराजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत नवीन शिवाजी पुलाचे काम बंद पडू दिले जाणार नाही, असे खा. छत्रपती संभाजीराजे यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ते म्हणाले, नवीन शिवाजी पुलाचा विषय गेले अनेक वर्षे गाजतो आहे. यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या पुलाचे काम का रखडले, या विषयी स्वतः माहिती दिली आहे. त्यांनी सचिव राजीव टोपनो यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले. त्यानंतर पीएमओ कार्यालयाचे प्रधान सचिव हितेंद्र मिश्रा यांच्याशीही चर्चा झाली. पुरातत्व खात्याच्या जागेच्या बाजूस शंभर मीटरच्या आत सार्वजनिक हितासाठी काम सुरु असेल तर त्यासंबंधीचा पूर्वीचा कायदा बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. लोकसभेत त्याला मंजूरी मिळाली, पण तो राज्यसभेत मंजूर झाला नाही. तो स्वंतत्र समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला.

पुरातत्व खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत होतो. शंभर मीटरच्या परिसरात ही जागा नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे ही परवानगी दिली होती. काम वर्षभर सुरु होते. पण कालच पुरातत्व खात्याने या कामासंबंधी नोटीस बजावली आहे. नोटीस का पाठवली यासंबंधी माहिती घेतली असता, यापूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक प्लॅन पुरातत्व खात्याला दिला होता. त्यामध्ये शंभर मीटरच्यामध्ये येणाऱ्या सर्व जागा ताब्यात देवू, असे सांगितल्याने एका दिवसात परवानगी मिळाली होती. त्यामुळे पुलाचे काम सुरु झाले.

हे काम सुरु असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागेपैकी एक एकर जागा ही खाजगी मालकीची असल्यामुळे त्याची नुकसान भरपाई पुरातत्व खात्याने द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठवण्यात आले. पुरातत्व खात्याने त्यास नकार देत ही नुकसान भरपाई राज्यशासनाच्या महसूल विभागातर्फे दिली जावी, असे त्यांनी सुचवले. त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत. मान्य केल्याप्रमाणे शंभर मीटरमध्ये येणाऱ्या जागा न दिल्याने पुरातत्व खात्याने नोटीस बजावली.

यासंबंधी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नवीन शिवाजी पुलाचे काम बंद पडल्यास आम्ही खपवून घेणार नाही. यापूर्वी सामंजस्यानी पंतप्रधान कार्यालयासह सर्व संबंधीत अधिकाऱ्यांशी बोलणी झाल्या आहेत. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत काम बंद पडू दिले जाणार नाही. असा इशारा खा. संभाजीराजे यांनी दिला.

429 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash