Breaking News

 

 

‘गोकुळ मल्टीस्टेट’साठी ना हरकत दाखल्यास कर्नाटकचा नकार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) मल्टीस्टेटसाठी आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) नाकारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गोकुळ दूध संघाला मल्टीस्टेट करण्यासाठी सत्तारुढ गटाने प्रयत्न केले. या निर्णयाला गोकुळ बचाव समितीने विरोध केला होता. त्या संदर्भात दूध उत्पादकांच्या सहभागाने गोकुळवर मोर्चा काढून मल्टीस्टेटच्या निर्णयाला विरोध केला होता. तरीसुध्दा गोकुळच्या संचालक मंडळाने दि. ३० सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोकुळ मल्टीस्टेट करण्यासंबंधातील विषय मांडला होता. पण यावर कोणतीही चर्चा न होता व सभासदांचा तीव्र विरोध असतानासुध्दा बेकायदेशीररित्या हा विषय मंजूर करुन घेतला होता.

यासंदर्भात आ. सतेज पाटील, खा. राजू शेट्टी, आ. हसन मुश्रीफ, आ. चंद्रदीप नरके यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी तसेच सहकार मंत्री, सहकार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करुन या बेकायदेशीर सभेसंदर्भातील वस्तुस्थिती मांडली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारच्या वतीने गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र नाकारले आहे.

पाटील यांनी सांगितले की, या संदर्भात कर्नाटक सरकारच्या सहकार विभागाचे निबंधक डॉ. एन. मंजूळा यांनी केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना दि. २१ मार्च २०१९ रोजी सविस्तर पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बेळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यक्षेत्र जिल्ह्यातील संपूर्ण तालुके आहेत. बेळगाव जिल्ह्यातील ७६५ सहकारी दूध उत्पादक संस्था या संघाच्या अधिपत्याखालील आहेत. कर्नाटक सरकारच्या धोरणात्मक निर्णयानुसार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय वाढविण्याला प्राधान्य द्यावयाचे ठरवले असून त्यानुसार जास्तीत-जास्त दूध उत्पादक संस्था स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच या सहकारी दूध संस्थांमध्ये जमा होणारे जादा दूध हे स्थानिक पातळीवर सुध्दा विकले जाते. त्यामुळे कर्नाटक सहकारी दूध उत्पादक फेडरेशन आणि बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी बेळगाव जिल्ह्यातील अथणी, चिक्कोडी, हुक्केरी तालुक्यातील दूध संस्था या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला जोडण्यास तसेच गोकुळचे कार्यक्षेत्र कर्नाटक राज्यात विस्तारण्यास विरोध दर्शवला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभागाने गोकुळला मल्टीस्टेट करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वरील तीन तालुक्यांतील संस्था गोकुळला जोडू नयेत असेही यामध्ये म्हटले आहे.

4,851 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा