Breaking News

 

 

पशुखाद्याच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचा ‘गोकुळ’वर मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ संघाने दूध उत्पादक सभासदांना कोणतीही पूर्वसूचना न देता महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरात अन्यायी दरवाढ केली आहे, ती रद्द करावी या मागणीसाठी शिवसेनेने आज (मंगळवार) दुपारी रणरणत्या उन्हात गाय-म्हशी घेऊन संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढला.  तसेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी गोकुळ संघाने सर्वाधिक मागणी असलेल्या महालक्ष्मी पशुखाद्याच्या दरामध्ये, प्रतिकिलो दोन रुपये याप्रमाणे प्रतिबॅग शंभर रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र संघाने चलाखी करीत ज्या पशुखाद्याला मागणी कमी आहे,  त्यामध्ये दरवाढ करणे टाळले. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक गणित बऱ्याच अंशी कोलमडणार आहे, त्यामुळे त्यांच्यामधून या निर्णयाबद्दल संताप व्यक्त होत आहे. त्यातच संघाने या दरवाढीबद्दल कोणतीच पूर्वसूचना दिलेली नाहीये. ही दरवाढ अन्यायी असून ती रद्द करावी, अशी मागणी करीत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली संघावर चक्क गायी-म्हशी घेऊन मोर्चा काढण्यात आला.

यावेळी संजय पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सूचना न देता पशुखाद्याच्या दरात पोत्याला १००/- रू अशी वाढ करण्यात आली. दूधाला प्रति लीटर २/- रूपये इतकी दवरवाढ करावी. गाईचे दूध २०१० ला प्रतिलीटर २७ रूपये इतके होते. पण २०१८ ला गाईचे दूध प्रतिलीटर २ रूपयांनी कमी करण्यात आले. शासनाने ३१ जुलै २०१८ ला ५ रूपयेचे अनुदान जाहीर केले असले तरी गायच्या दूध दरात वाढ झाली नाही. गाईचे प्रतिलीटर दुधाचा दर रु. २७ इतका करावा अशी मागणी त्यांनी केली.

या मोर्चात अवधूत साळुंखे, शुभांगी पोवार, कृष्णात पोवार, शिवाजी जाधव, चंद्रकांत भोसले, दिलीप माने, विनोद खोत, प्रकाश पाटील यांचेसह शिवसैनिक, दूध उत्पादक सहभागी झाले होते.

672 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग