नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  संपूर्ण जगाचे टेन्शन वाढवणाऱ्या कोरोनाची दहशत अजूनही कायम आहे. कोरोनाने गेल्या दोन वर्षात जगभरातील अनेक देशातील नागरिकांचा बळी घेतला आहे. आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्यामुळे जगभरातील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला; पण कोरोनाने काही पाठ सोडली नाही. या कोरोनामुळे पुन्हा टेन्शन वाढले आहे. कारण काही देशांमध्ये कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, ‘काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा व्हेरिएंट असणाऱ्या ओमायक्रॉनच्या XBB सबव्हेरियंटसह संक्रमणाची दुसरी लाट येऊ शकते. ‘ओमायक्रॉनचे जवळपास ३०० सबव्हेरिएंट आहेत. यामधील XXB हा व्हेरिएंट सध्या चिंतेचे कारण होणार आहे. हा व्हेरिएंट सर्व देशांची चिंता वाढवणारा आहे. हा व्हेरिएंट तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवरही मात करु शकतो. त्यामुळे काही देशांमध्ये XXB मुळे कोरोनाची आणखी लाट येऊ शकते. आम्ही बीए.५ आणि बीए.१ यांच्या मुख्य कारणांचा मागोवा घेत आहोत. हा व्हेरिएंट ज्याप्रमाणे विकसित होत जाईल त्याप्रमाणे तो अधिकाधिक संक्रमित होईल.’

कोरोनाचे नवीन सबव्हेरिएंट अती-धोकादायक असल्याचे अद्याप कोणत्याही देशाकडून सांगण्यात आले नाही. कोरोना ही अद्यापही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी सांगितले असल्याची माहिती सौम्या स्वामीनारायण यांनी दिली आहे. सध्या जगभरात आठवड्याला ८ ते ९ हजार लोकांच्या मृत्यूची नोंद होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.