Breaking News

 

 

नागरिकांच्या रुद्रावतारापुढे मुरगूड पालिका नमली : नवीन ब्लोअर मशीनची २४ तासात जोडणी

मुरगूड (प्रतिनिधी) : दूषित पाणीप्रश्नी नागरिकांनी संतप्त पवित्रा घेत मुरगूड नगरपालिकेला टाळे ठोकल्याच्या घटनेनंतर  खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने अवघ्या २४ तासांत सुमारे ३ लाख ३७ हजार रुपयाच्या नव्या पाणी शुद्धीकरण करणाऱ्या ब्लोअर मशीनची जोडणी आज (मंगळवार) सुरू केली. पुढील २ ते ३ दिवसात  नागरिकांना स्वच्छ पाणी  मिळेल अशी माहिती निवेदनाद्वारे  पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

दीड वर्षापासून नागरिकांच्या सततच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला अखेर नागरिकांपुढे झुकावे लागले. हतबल झालेल्या  पालिका प्रशासनाने दूषित पाणी प्रश्नाबाबत आज खुलासा देताना प्रशासकीय अडचणी चा पाढा वाचला.  नागरिकांच्या तक्रारी बेदखल केलेल्या पालिकेला एकाच दिवसात ब्लोअर मशीन कसे काय मिळाले, याचेच आश्चर्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रश्नी  पालिकेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

पालिका प्रशासनाकडून  मुरगूड शहरात  अशुद्ध आणि अळीमिश्रित पाणीपुरवठा सुरु होता. वारंवार तक्रारी देऊनही पालिकेने कोणतीच कार्यवाही न केल्याने  सोमवारी शहरातील संतप्त नागरिकांनी  पालिकेवर धडक देत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या केबिनला टाळे ठोकले होते. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या मनमानी कारभारामुळेच  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याचा ठपका ठेवत १६ नगरसेवकांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले होते.

त्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने तातडीने नवे ब्लोअर मशीन जलशुद्धीकरण केंद्रावर बसवण्यास सुरुवात केली. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१८ मध्ये नवे ब्लोअर मशीन बसवण्याचा ठराव झाला होता. पण जुने ब्लोअर मशीन दुरुस्त दुरुस्त करणार्‍या कंत्राटदाराने चालढकल केल्याने नव्या मशीनची निविदा प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली होती. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करता आला नव्हता.

दुसऱ्या बाजूला पाणीप्रश्नावर राजीनामे देणाऱ्या सोळा नगरसेवकांच्या राजीनाम्याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. एकही राजीनामा प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पोहचला नसल्याचे समजते.

714 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश