पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात. यामधील बालविकास घटकाअंतर्गत पन्हाळा शहरातील दोन अंगणवाड्यांना महिला व बालविकास ५ टक्के राखीव निधी अंतर्गत विविध साहित्याचे वाटप केले. या साहित्यामध्ये विविध प्रकारची आणि शालेय उपयोगी साहित्य, तिजोरी, वजन काटे, बोर्ड, स्टेशनरी इत्यादी साहित्याचा समावेश आहे.

पन्हाळा शहरातील शासकीय अंगणवाडीमधील लहान मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, या हेतूने नगरपरिषदेच्या राखीव निधीतून हे साहित्य वाटप करत असल्याचे नगरपरिषदेच्या प्रशासक विद्या कदम यांनी सांगितले. या निधीतून १८ ते ४५ वयोगटातील महिलांसाठी चारचाकी वाहन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

पन्हाळा नगरपरिषदेच्या दिव्यांगसाठी राखीव पाच टक्के राखीव निधीमधून एकूण २७ पात्र दिव्यांग लाभार्थी यांच्या बँक खात्यावर १८,८८९ रुपये प्रत्येकी प्रमाणे निधी वर्ग करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, रवींद्र तोरसे, तेजस्विनी गुरव, वकील जी. जी. नानिवडेकर, प्रशासकीय अधिकारी अमित माने, अभियंता मुकुल चव्हाण व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.