गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ येथे अंध व्यक्तींसाठी दोन दिवसीय मोफत स्वयंसिद्धता कार्यशाळा होणार आहे. मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त या अनिवासी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. २८ व २९ ऑक्टोबरला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत लक्ष्मी देवालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा होईल. स्वागत थोरात (मुंबई) हे अंधांना मार्गदर्शन करणार आहेत.

अंध व्यक्तींचे जगणे सुसह्य व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. पांढरी काठी कशी वापरावी, पायऱ्यांची रचना समजून घेऊन पायऱ्या कशा चढायच्या-उतरायच्या, रस्त्यावर पांढरी काठी घेऊन सुरक्षीतपणे कसे चालायचे, भाज्या-फळे कशा ओळखाव्यात, वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, खाद्यपदार्थ कसे ओळखावेत, आवाजावरुन पक्षी, प्राण्याची ओळख पटविणे, दिशा कशा ओळखाव्यात, स्नायूंची लवचिकता वाढविण्यासाठी व्यायाम प्रकार, इतर ज्ञानेंद्रियांचा सक्षमपणे वापर कसा करावा यासह दैनंदिन जीवनात वावरताना येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी, याबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होणारे अंध व त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाइकांची अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. अंधांना पांढऱ्या काठीचे मोफत वितरण केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अंधांच्या नातेवाइकांनी सागर पोवार व प्रकाश चोथे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.