कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९ कोटी  ४० लाख ५६ हजार १०८ इतक्या निधीतील कामाची स्थगिती उठवून निधी वर्ग करावा, अशी मागणी काँग्रेसचे आ. सतेज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांनी हयात असतानाच आपली समाधी सिद्धार्थनगर, नर्सरीबाग येथे करावी, अशी त्यांची इच्छा  व्यक्त केली होती. यानुसार आणि शाहूप्रेमी जनतेच्या मागणीचा विचार करून महापालिकेने राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे समाधी स्मारकस्थळ नर्सरी बागेत उभारले. महापालिकेने स्वनिधीतून तीन कोटींच्या कामांचा पहिला टप्पा पूर्ण केला.

दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी निधीची आवश्यकता होती. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी या निधीसाठी पाठपुरावा केला. माजीमंत्री धनजंय मुंडे, विश्वजित कदम यांनी ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ इतक्या निधीला मान्यता देत या संदर्भातील अध्यादेशही काढला. राज्यात सत्तांतर झाले. मागच्या सरकारच्या सर्व निर्णयांना स्थगिती दिली. यामध्ये शाहू समाधीस्थळासाठी मंजूर झालेला ९ कोटी ४० लाख ५६ हजार १०८ इतक्या निधीचा समावेश होता.