Breaking News

 

 

अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे वाढले आहेत. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ या धंद्याना मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैध धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशा मागणीचे निवेदन आज (मंगळवार) आ. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका, जुगार, वेश्या व्यवसाय, मॅच बेटिंग, गांजा विक्री खुलेआम सुरु आहे. याविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी वेळोवेळी शिवसेनेकडून केली जाते. पण, पोलीस प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांचे अवैध धंदेवाईकांशी असलेले लागेबांधे आहेत. यामुळे या धंद्यांना लगाम बसण्याऐवजी त्याला पाठबळ मिळत आहे.

काही महिन्यांपूर्वी एक मटका व्यावसायिकावर कारवाई केल्यानंतर त्याने खुलेआम प्रसिद्धी माध्यमांसमोर कोणत्या पोलीसाना किती हप्ते दिले जातात, त्याच्या हिशोबाच्या चिठ्याच सादर केल्या. गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात मॅच बेटिंग अड्यावर छापा टाकण्यात आला. परंतु, त्यानंतर झालेल्या जुजबी कारवाई करण्यात आली. तर शहरात गांजा विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. कॉलेज, बगीच्यामध्ये, निर्जनस्थळी असे गांजा विक्री खुलेआम चालू आहे.

यासह कोल्हापूर शहरातील एका पोलीस ठाण्यासमोरच अवैध वेश्याव्यवसाय खुलेआम  सुरु असल्याचे राजरोस पहायला मिळते. पण, त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन तत्परता दाखवीत नाही. त्यामुळे या परिसरात येणाऱ्या महिलांनाही अनेकवेळा नाहक त्रासास सामोरे जावे लागते. यासाठी जिल्ह्यासह शहरात फोफावलेल्या अवैद्य धंद्यांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याच्या मुळाशी जाऊन अवैध धंदे उखडून काढावेत, अशी मागणी आ. क्षीरसागर यांनी निवेदनात केली आहे.

207 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश