कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनमधील गरजू ५ महिला अभ्यासकांची सर्व फी आपण देणगी स्वरूपात देत असल्याचे कोल्हापुरातील उद्योजक व सल्लागार समितीचे सदस्य सुरेन्द्र जैन यांनी जाहीर करून १५,५०० रुपयांचा चेकही दिला आहे.

महावीर अध्यासनमेफ्त पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतले जातात व त्यातून जैनधर्माची मूलतत्त्वे शास्त्रीय बैठक श्रावकाचार याबाबत मार्गदर्शन केले जाते. या अभ्यासक्रमास वयोमर्यादा नसल्याने या अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही विद्यार्थी विशेषतः महिला या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास तयार होते; परंतु त्यांना आर्थिक अडचणीने शक्य नव्हते. या बाबत दि. २३ सप्टेंबर रोजी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत ५ गरीब व गरजू विद्यार्थ्यांना भगवान महावीर अध्यासनामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक ती फी सवलत देण्याबाबत कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.

एस. पी. वेल्थचे प्रवर्तक अनिल पाटील यांनी देखील गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या स्वयंस्फूर्त देणगीबद्दल भगवान महावीर अध्यासनचे समन्वयक प्रा. डॉ. विजय ककडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील़, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, देणगी समितीचे अध्यक्ष डॉ. जे. एफ. पाटील यांनी सुरेन्द्र जैन यांचे आभार मानले आहेत.