कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दि. २१ ऑक्टोबरपासून संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २.०० रुपये, तर गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर ३.०० रुपये याप्रमाणे दरवाढ दिली आहे. संचालक मंडळाच्‍या मीटिंगमध्‍ये हा निर्णय घेण्‍यात आल्याची माहिती संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी दिली.

दि.२१ ऑक्टोबरपासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर रुपये ४७.५० असा, तर गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिच्या दुधास प्रतिलिटर रुपये ३५ असा दर राहील, असे सांगून पाटील म्हणाले, म्हैस व गाय दूध दरवाढ करून शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त एक प्रकारची भेट दिली आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवण्यात येणार आहे.