कोल्हापूर(प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे लीड महाविद्यालयाच्या क्लस्टर अंतर्गत पेटंट, कॉपीराईट, ट्रेड मार्क यावर दोन दिवसीय कार्यशाळा झाली.

माय क्रेव कन्सल्टन्सी, बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव ब्रह्मभट व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मेनन यांनी मार्गदर्शन केले. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. देश बलशाली बनवण्यासाठी आपण या क्षेत्रात एक पाऊल पुढे असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

पेटंट किंवा कॉपीराईट करणे हे किती सहज आणि सुलभ आहे, ते कसे रजिस्टर करावे हे उदाहरणासह त्यांनी दाखवून दिले. या कार्यशाळेचे उद्घाटन कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांच्या हस्ते झाले. प्राचार्य डॉ संतोष चेडे, अधिष्ठाता रिसर्च डॉ. अमरसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाकरिता आयपीएल पॉलिसीचे अनावरणही तसेच महाविद्यालयाच्या इनोव्हेशन कौन्सिलचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.