Breaking News

 

 

दूषित पाण्यावरून मुरगूडवासीयांचा पालिकेत राडा ; तर १६ नगरसेवकांचे राजीनामे

मुरगूड (प्रतिनिधी) : मागील दीड वर्षांपासून दूषित, अपुऱ्या व अवेळी पाणीपुरवठ्याने मनस्ताप सोसणाऱ्या मुरगूड शहरवासीयांमधील असंतोषाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी आज (सोमवार) पालिकेवर विराट मोर्चा काढत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या केबिनला टाळे ठोकले. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना तर अक्षरशः हाताला धरून केबिनबाहेर काढले. नागरिकांच्या या रुद्रावताराने अस्वस्थ झालेल्या १६ नगरसेवकांनी एकाच वेळी आपले राजीनामे गटनेते प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे सादर केले. जमादार यांच्या मनमानीमुळेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून मंडलिक गटाची यामुळे बदनामी होत असल्याचा आरोप १४ नगरसेवकांनी या वेळी केला.

मुरगूडमध्ये मागील महिनाभरापासून अत्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. पिवळसर रंगाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या दिसत आहेत. या दूषित पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला. नागरिकांनी आज सकाळी पालिकेवर विराट मोर्चा काढला. सर्व नगरसेवक व नगरसेविकांसह माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, पांडुरंग भाट, भारत भाट, अनिल राऊत, सचिन मेंडके, भगवान लोकरे, किरण गवाणकर, आनंदा मांगले, डॉ. सुनिल चौगले,सर्जेराव पाटील, एकनाथराव देशमुख, सर्जेराव भाट, आनंदा मंडलिक, संग्राम साळोखे आदींसह नागरिकांनी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना जाब विचारत निरुत्तर केले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या केबिनला टाळे ठोकले.

शहराला पुरवले जाणारे  पाणी स्वच्छ करणारे  ब्लोअर  मशीन  दीड वर्षापासून  बंद आहे. याबाबत  पालिकेत  नगरसेवकांनी  आवाज उठवून ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी  ब्लोअर मशीन खरेदीचा ठरावही केला. पण  पालिका प्रशासनाने ती घेतली नाही. सध्याचा दूषित पाण्याचा प्रश्न नगराध्यक्षांच्या  हेकेखोरपणाचाच  प्रताप असल्याचे उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी  नागरिकांपुढे स्पष्ट केले.

तसेच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या मनमानी व एकाधिकारशाहीमुळेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून दीड वर्षे दूषित पाणी शहरवासियांना पुरवले जात आहे. २०१६ पासून मंडलिक गटाची एकहाती सत्ता असूनही नगराध्यक्षांच्या मनमानीमुळे शहराचा विकास ठप्प होऊन गटाची बदनामी होत आहे, असा आरोप करीत पालिकेतील मंडलिक गटाचे १४ आणि विरोधी २ अशा १६ नगरसेवकांनी आपले सामुदायिक राजीनामे गटनेते प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे सोपवले. यामध्ये उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, पक्षप्रतोद जयसिंगराव भोसले, विरोधी पक्षनेता राहुल वंडकर, पाणीपुरवठा सभापती रविराज परीट, नगरसेवक संदीप कलकुटकी, मारुती कांबळे, एस. व्ही. चौगुले, दीपक शिंदे, धनाजी गोधडे, नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, सुप्रिया भाट, रेखाताई मांगले, हेमलता लोकरे, वर्षाराणी मेंडके, रंजना मंडलिक, अनुराधा राऊत यांचा समावेश आहे. नागरिकांपुढे सामुदायिक राजीनामा पत्राचे वाचन संतप्त करण्यात आले.

नगराध्यक्षांना दालनाबाहेर काढले…

नागरिकांचा संताप इतका अनावर झाला होता की, त्यांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना हाताला धरुन दालनातून बाहेर काढले. दोन तासानंतर नागरिक घरी परतल्यावर पुन्हा जमादार नगरपालिकेत जाऊन बसल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी पुन्हा पालिकेत जाऊन जमादार यांना बाहेर काढले.

1,806 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग