धामणी खोऱ्यातील गावांचे आता ‘मिशन विधानसभा..!

1 1

कळे (प्रतिनिधी) : मागील २० वर्षांपासून तीन तालुक्यांना जोडणारा राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी संपूर्ण धामणी खोऱ्यातील ३० हजार मतदारांनी लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार यशस्वी केला. आता विधानसभा निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रकल्पासाठी शासनावरील दबाव वाढवण्यासाठी मोर्चे, उपोषण, रस्ता रोको आदी मार्गांचा अवलंब करून शासनाकडे कोणत्याही प्रकारचे कर भरायचे नाहीत, असाही निर्णय घेण्यात आला. पणोरे (ता. पन्हाळा) येथील महादेव मंदिरात धामणी कृती समितीचे सर्व सदस्य व सर्व गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात हे निर्णय घेण्यात आले.

या मेळाव्यात सुरुवातीस भागातील अपघातात व आकस्मिक निधन झालेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  त्यानंतर  मागील ५ महिन्यांपासून बहिष्काराचा लढा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या  सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यानंतर आगामी सर्व निवडणुकांवरील बहिष्काराचा निर्णय ठाम करण्यात आला त्यामध्ये  अवघ्या ८ ते ९ महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा लढा तीव्र करण्याचे ठरले

जर शासनाने चर्चेला बोलावले तर जाण्याचे व विचार विनिमय करून निर्णय घेणे, मतदान बहिष्काराबरोबरच रास्तारोको, मोर्चे, उपोषण, शासनाचा  कोणताही महसूल न भरणे  इत्यादीचा समावेश होता. त्यानंतर भागातील ज्या गावांनी यात भाग घेतला नाही त्यांना जोरदार विरोध दर्शविण्यात आला. तसेच मतदान बहिष्कारावर सुरुवातीला होकार दर्शवणाऱ्या  काही गावातील मुख्य कार्यकर्त्यांनी पैशाला भुलून मतदान केले असा आरोप ठेवून त्यांना जाब विचारण्याचा व त्या गावातील नागरिकांना कोणत्याही कार्यक्रमास व इतर समारंभास न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी कर्नाटकमध्ये घडलेल्या घटनेच्या धर्तीवर येणाऱ्या विधानसभेत प्रत्येक गावातून दोन व्यक्तींना निवडणूक रिंगणात उभे करून शासनाची कोंडी करण्याचे आवाहन बळीपवाडी येथील संभाजी बळीप यांनी केले. धामणी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी २३ फेब्रुवारी २०२० बेमुदत पासुन आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा खेरिवडे येथील निवृत्त प्रशासकीय अधिकारी शिवाजी वर्धन यांनी दिला. धामणी प्रकल्प पूर्ण होईतो अखिल भारतीय ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना धामणी खोऱ्यातील जनतेच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय ऊस तोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आबासाहेब चौगले यांनी या वेळी दिली.

1 Comment
  1. padval sir says

    धरण प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ;शिवाय तो पूर्ण होई पर्यंत पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे :

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More