इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील वाढते प्रदुषण, पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त आणि प्रोसेसधारकांसमोरील अडचणी संदर्भात ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे आ. प्रकाश आवाडे, जि.प. सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील प्रोसेसधारकांची बैठक पार पडली.

आ. आवाडे यांनी, वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा आणि तो वाचावा यासाठी दहा-बारा वर्षापूर्वी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) प्रकल्प उभारला गेला. त्यामुळेच वस्त्रोद्योग विशेषत: कापडावर प्रक्रिया करणारा महत्वाचा घटक असलेला प्रोसेसिंग व्यवसाय टिकला आहे. परंतु, शहरातील प्रदुषणाचा प्रश्‍न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे. इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून आता ते गारमेंट हब आणि एक्स्पोर्ट सिटी म्हणून नावारूपास येत आहे. याठिकाणी झेडएलडी प्रकल्प उभारण्याची नितांत गरज असल्याचे सांगत आपण पुढाकार घेऊ त्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

एसटीपी प्रकल्प योग्य क्षमतेने सुरु नसल्याने मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळते. त्यामुळे काही प्रमाणात महापालिकाही प्रदुषणाला जबाबदार आहे. झेडएलडी प्रकल्पासाठी जागा निश्‍चित करुन आयआयटी मुंबई यांचेकडून डीपीआर तयार करुन घ्या. हा प्रकल्प खर्चिक असला तरी शहर प्रदुषणमुक्त होणे याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या संदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन आवश्यक ते अनुदान मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर प्रदुषण नियंत्रण महामंडळानेही प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता प्रोसेसधारकांकडून केली जात आहे की नाही याची तपासणी करावी आणि योग्य व खरा अहवाल द्यावा, अन्यथा मंडळालाच जबाबदार धरु, असा इशाराही आ. प्रकाश आवाडे यांनी दिला.

यावेळी ताराराणी पक्षाचे प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिन हरबड, सीईटीपी संदीप मोघे, गिरीराज मोहता आदींसह प्रोसेसधारक व ताराराणी पक्षाचे सर्व पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.