मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

न्यायालयाच्या निकालामुळे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके उद्या ठाकरे गटातर्फे उमेदवारी अर्ज भरतील. अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने मंजूर न केल्यामुळे लटके यांना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येत नव्हता. त्यामुळे मुंबई पालिकेविरोधात ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर न्यायमुर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अ‌ॅड. विश्वजित सावंत तर, मुंबई पालिकेतर्फे अ‌ॅड. अनिल साखरे यांनी बाजू मांडली.

सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप मंजूर केला नाही, असा आरोप लटके यांच्या वकिलांनी केला, तर ऋतुजा लटके यांच्याविरोधात १२ ऑक्टोबर रोजी पालिकेकडे एक भ्रष्टाचाराची तक्रार आली आहे. ही केस प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, असे मुंबई पालिकेतर्फे सांगण्यात आले होते.