कोल्हापूर (प्रतिनिधी) : दीपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या संस्थांमधील महिला व बालकांना देखील होण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, व्यापारी संघटना, मोठे व्यावसायिक, सीएसआर अधिकारी, दानशूर व्यक्तींनी अशा संस्थांना प्रमुख अतिथी म्हणून भेट द्यावी.

या संस्थेमध्ये एक दिवसीय दीपावली सण तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यामध्ये सहभागी होऊन महिला व निराधार बालकांचा उत्साह वाढवावा व दिवाळीचा आनंद व्दिगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. निराधार, पीडित, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या, बेकायदेशीर व्यापाराला बळी पडलेल्या महिला आणि अनाथ, पोक्सो कायद्याअंतर्गत बळी पडलेली मुले, आई-वडील दोन्ही किंवा एक पालक गमावलेली, आई-वडील दोघेही बेपत्ता असलेली, अवैध व्यापाराला बळी पडलेली मुले, दोन्ही पालक तुरुंगात असलेल्या पालकांची मुले यांच्यासाठी आणि रस्त्यावर भिक मागणाऱ्या, मदतीची गरज असणाऱ्या अनाथ, निराधार बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात.

जिल्ह्यामध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांकरिता १० बालगृहे, २ शिशुगृहे, १ महिला आधारगृह व १ शासकीय महिला वसतीगृह कार्यरत आहे. या संस्थांमधील महिला व निराधार बालकांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले.