कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०  ते ६ या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नामांकित ४० पेक्षा अधिक खासगी आस्थापनांमधील ३ हजारपेक्षा जास्त रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सातवी ते पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर इत्यादीमधील   नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे. हा मेळावा विनामूल्य असून, नोकरी इच्छुक जास्तीत-जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात शुक्रवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.