कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये एचआयव्ही संसर्गितांची संख्या सध्यस्थितीत आटोक्यात आहे; मात्र एड्स नियंत्रणात पूर्वीपासूनच अंगणवाडी सेविकांचे महत्वाचे योगदान लाभले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी सांगितले. जिल्हा एड्स नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटलतर्फे बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रात झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. निवेदिता महाडिक, जिल्हा पर्यवेक्षक निसंजन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपा शिपूरकर म्हणाल्या, शिक्षण व आरोग्य विभागातील अनेक जबाबदाऱ्या पार पडत असताना लहान मुलांची जडणघडण करण्यात अंगणवाडी सेविका यांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीत रक्ताची एचआयव्ही तपासणी झाल्यास संसर्गित मातेच्या बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग वेळीच योग्य ते उपचार देऊन टाळता येतो. यामुळे अंगणवाडी सेविकांची भूमिका ही पालकांपासून बालकास होणारा एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध कार्यक्रमाचा पाया ठरत आहे.

यावेळी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या मोफत रक्त तपासण्या करण्यात आली. समुपदेशक मकरंद चौधरी, विनायक देसाई, कपिल मुळे, इंद्रायणी तारू, दीपक सावंत, सागर पाटील, यांनी एचआयव्ही एड्स विषयांवर विविध सत्रे घेतली.