मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे व आमदार भास्कर जाधव यांच्यासह अन्य २ विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन गटांत हाणामारी होईल या उद्देशाने या तिन्ही नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली, असा आरोपही या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच कलम ५००, ५०४ अंतर्गत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा गुन्हाही या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाने नुकतीच महाप्रबोधन यात्रा काढली होती. या मेळाव्यात ठाकरे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. आमदार भास्कर जाधव यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करताना कागद कसे वाचून दाखवतात, याची नक्कलच करुन दाखवली होती. सुषमा अंधारे यांनीही शिंदेंसह मोदींवर बोचरी टीका करत चाय विकता विकता पंतप्रधानांनी देश विकल्याची टीका केली होती, तर खासदार विनायक राऊत यांनी शिंदेंसह नारायण राणेंवरही बोचरी टीका केली होती.
ठाण्यातील या मेळाव्यामध्ये प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मालिन केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाचाही यात समावेश आहे. त्यामुळे ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक चिघळताना दिसत आहे.