कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील यादवनगरमध्ये दारुच्या नशेत शिवीगाळ, दमदाटी करत असल्याच्या रागातून शाहूनगर येथील गुंड संदीप ऊर्फ चिनू हळदकर याचा दि.२४ सप्टेंबरला दगडाने ठेचून खून करणाऱ्या फरार संशयित आरोपीस आज उजळाईवाडी ब्रिज ते शिवाजी विद्यापीठ रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. श्रीधर ऊर्फ दादू बाळकृष्ण पोवार (वय ३०, रा. दौलतनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

संदीप हळदकर हा दोन महिन्यांपूर्वी तुरुंगातूनमधून बाहेर आल्यानंतर वारंवार दारुच्या नशेत यादवनगरमध्ये दहशत माजवत होता. या दहशतीला कंटाळून जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून त्याचा दि.२४ सप्टेबर रोजी श्रीधर पोवार याच्यासह मित्रांनी संदीप हळदकर याचा दगड, विटांनी ठेचून खून केला होता. तातडीने पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या खुनातील फरार असलेल्या श्रीधर पोवार यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उजळाईवाडी ब्रिज ते शिवाजी विद्यापीठ रोडवर सापळा लावून अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि किरण भोसले, नेताजी डोंगरे, अंमलदार श्रीकांत मोहिते, उत्तम सडोलीकर, वैभव पाटील, शिवानंद मठपती, सचिन देसाई, रणजित पाटील यांनी केली.

मृत चिन्यावर मारामारी, खुनीहल्ला, खंडणी वसुलीचे १० ते १२ गुन्हे दाखल होते. त्याच्यावर तडीपारीची कारवाई झाली होती. २४ सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास मृत चिन्या हळदकर आणि संशयितांमध्ये दौलतनगर परिसरात वादावादी झाली. याच वादावादीतून चौघांनी चिन्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी तो यादवनगरच्या दिशेने पळत असतानाच हल्लेखोरांनी महावितरण कार्यालयाजवळ गाठले. बेदम मारहाण झाल्याने तो खाली कोसल्यानंतर हल्लेखोरांनी दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला होता.