कुरुंदवाड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त देव संस्थानमध्ये सफाईसाठी कार्यरत असलेले राहुल परमार व गोविंद चव्हाण यांनी सेवेत कायम करावे, पगारवाढ करावी व अन्य मागणीसाठी नृसिंहवाडीतील रिक्षा चौक परिसरात सुरु केलेले बेमुदत उपोषण ठोस आश्वासन दिल्यानंतर मागे घेतले आहे.

किसान सेल लोकजन शक्ती पार्टीचे प्रदेशचे जिल्हा अध्यक्ष सुनील कुरूंदवाडे व आयुब पट्टेकरी, किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासूनया कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. याबाबत दत्त देव संस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे, सचिव संजय पुजारी व विश्वस्त वैभव पुजारी, सोनू पुजारी, गजानन पुजारी व तंटामुक्त अध्यक्ष संतोष खोंबारे यांनी सकरत्मक चर्चा केली.

यावेळी विश्वस्त वैभव पुजारी व विश्वस्त व तंटामुक्ती नृसिंहवाडीचे संतोष खोंबारे यांनी मागणीबाबत योग्य न्याय देण्याचे आश्वासन देऊन हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देत सुनील कुरूंदवाडे यांनी दत्त देव संस्थानच्या विश्वस्तबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून उपोषण स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी उपोषण करणारे राहुल परमार व गोविंद चव्हाण यांना देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे व सचिव संजय पुजारी यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.