कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री आणि आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाने अतिशय चांगले काम केले आहे, असे प्रतिपादन उद्योगपती राजेंद्र मालू यांनी केले. लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जंतनाशक औषधाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर होते. जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी उघड्यावरचे खाद्यपदार्थ टाळावेत, नेहमी हात स्वच्छ ठेवावे, मुलांमध्ये जतांच्या  प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन सतत थकवा जाणवतो. त्यामुळे मुलांची शारीरिक वाढ व मानसिक विकास होत नाही. यासाठी जतांचा प्रादुर्भाव थांबणे गरजेचे आहे. शाळेत आणि घरात स्वच्छता राखून आपले शरीर आरोग्यदायी ठेवावे, असे आवाहन केले. मालू हायस्कूलच्या वतीने मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शंकर कवितगे, गटविस्तार अधिकारी दीपक कामत, बांधकाम अभियंता संदेश बदडे यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी दत्तवाडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्हटकर, बबन यादव, धनाजी गायकवाड, सुनील आलासकर, वर्षा खटावकर, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, वनिता काटकर, दिलीप माने, शिक्षक संजय सुतार यांच्यासह शिक्षक-शिक्षिका विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.