नवी दिल्ली : सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. येत्या ८ नोव्हेंबरला उदय लळित निवृत्त होणार असल्याने ७ ऑक्टोबरला केंद्र सरकारने सरन्यायाधीश उदय लळित यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे हे सर्वोच्चपद लागोपाठ दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती भूषविणार आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाल्यावर न्यायमूर्ती लळित यांची २७ ऑगस्ट रोजी देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उदय लळित यांचा सरन्यायाधीश म्हणून एकूण ७४ दिवसांचा कार्यकाळ आहे. ते आता महिन्याभरात निवृत्त होणार असल्याने नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उदय लळित यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची निवड केली जाते. सध्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वात ज्येष्ठ आहेत, त्यामुळे पुढील सरन्यायाधीश ते होऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीश हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाच्या नावाची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस करतो, अशी परंपरा आहे. विद्यमान नियमानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असेल. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे १९७८ ते १९८५ या कालावधित ते भारताचे १६ वे सरन्यायाधीश होते.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी कायद्याचे पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

१९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.