कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थान समिती नृसिंहवाडी यांच्याकडे नोकरीवर कार्यरत असणार्‍या दोन कामगारांना जातीहिन व दुय्यम वागणूक मिळत असल्याबाबत आणि सेवेत कायम करून न घेतल्या प्रकरणी लोकशक्ती पार्टीच्या (किसान सेल) वतीने जिल्हा अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे देवस्थान पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील श्रद्धास्थान श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थान समिती नृसिंहवाडी या संस्थेमध्ये सफाई कर्मचारी राहुल राम परमार हे गेले ७-८ वर्ष रोजंदारीवर काम करीत आहेत.

या संस्थेमध्ये काम करीत असताना राहुल परमार हा मागासवर्गीय जातीने म्हेतर या समाजाचा असल्यामुळे याच्यावर देवस्थानच्या पदाधिकार्‍यांकडून काम करीत असताना त्याला जातीहिन वागणूक दिली जात आहे. वास्तविक त्याला शासनाच्या किमान वेतनानुसार पगार १६,५०० रुपये इतके देणे गरजेचे असताना तो दिला जात नाही. त्यामुळे  जातीभेद करणाऱ्या या समितीतील पदाधिकार्‍यांची चौकशी होणे आवश्यक आहे.

एवढ्या मोठ्या देवस्थानमध्ये ट्रस्टीकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे या घटनेबाबत तत्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर म्हेतर (भंगी) या अॅक्टखाली कायदेशीर कारवाई व्हावी, या कर्मचाऱ्याला सेवेमध्ये कायमस्वरूपी दाखल करून घ्यावे. शिवाय बाळू ऊर्फ गोंविंद चव्हाण यांना कोर्टाचा निकाल असतानासुद्धा कामावरून कमी करण्यात आले आहे. याही कर्मचाऱ्याला कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. याबाबत दत्त देवस्थानचे सचिव संजय नारायण पुजारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संबंधित कर्मचाऱ्यांच्या बरोबर दोनवेळा आम्ही चर्चा केली आहे. या उपोषणात किशोर चव्हाण, इमरान झारी, कर्मचारी राहुल परमार, बाळू ऊर्फ गोविंद चव्हाण हे सहभागी झाले आहेत.