जळगाव : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भांडणात वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावले, अशी खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर खडसे यांनी ही टीका केली. ते आज जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ खडसे म्हणाले, इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. उद्धव ठाकरेंनी काय केले आणि एकनाथ शिंदे यांनी काय केले हे आता बोलून फायदा नाही. काही चुका उद्धव ठाकरेंच्याही असतील. ते पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे चुका होऊ शकतात. पण धनुष्यबाण मोडले ही वस्तुस्थिती आहे. एवढी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपावा. तुम्ही संपले आणि तेही संपले. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या संघर्षावर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वजण आशेने पाहत आहेत. मात्र, न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले.