मुंबई (प्रतिनिधी) : नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर संजय राऊत यांनी प्रथमच आपले मत मांडले आहे.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची आज न्यायालयीन कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांशी औपचारिक संवाद साधताना त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

शिवसैनिकांना संजय राऊत म्हणाले, एखाद्या पक्षाचे चिन्ह गेल्याची ही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. त्यांचे चिन्ह तर तीन वेळा बदलले होते. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. आता नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहीत आहे. आपल्यात शिवसेनेचे स्पिरीट आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे गटालाही शिवसेनेचे नाव व पक्षचिन्ह आता वापरता येणार नाही; मात्र या संघर्षामुळे भविष्यात आपण आणखी सक्षम होऊ, असेही राऊत म्हणाले.