मुंबई (प्रतिनिधी) :  शिवसेनेसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी दहा ऑक्टोबरला होणार असल्याचे, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. तर शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं. तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्रे सादर करु, पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दोन्ही गटासाठी चौवीस तासांचा वेळ देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशामध्ये : दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. दोन्ही गटांपैकी कोणालाही ‘धनुष्य आणि बाण’ हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.  दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात. दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे १० ऑक्टोबरला दुपारी एक वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.