पुणे : आपली संस्कृती, परंपरा, इतिहास काय सांगतो. दोन व्यक्तींनी काय, कुणीच कुणाला शिव्या देऊ नये. एवढ्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तसे बोलू नये. उच्च व तंत्र शिक्षण विभाग मिळाल्याने चंद्रकांत पाटील हे कदाचित नाराज असतील. त्यामुळे त्याचे संतुलन राहिले नाही का, हे कळायला मार्ग नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यवर प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असे म्हटले आहे.

‘एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. विनाशकाले विपरीत बुद्धीच म्हणायची वेळ आली. आई वडिलांना शिव्या द्या चालेल, आईवरुन शिव्या देणं कोल्हापूरची पद्धत आहे असे सांगता; पण कुणालाच शिव्या देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.