नाशिक (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात शनिवारी तीन अपघातांची मालिका पाहावयास मिळाली. तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विविध वाहनांनी पेट घेतल्याने शनिवार हा घातवार ठरला आहे.

हायड्रोजन सिलिंडरच्या वाहनाने पेट ​​​​​​घेतल्याची घटना​ मनमाड-मालेगाव रोडवरील कानडगाव फाट्यावरील ​​​​​​घडली आहे. स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे सिलिंडर २० ते २५  फूट उडाले आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

सुरतवरून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये मोठ्या स्फोट झाला. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रकचे पुढील टायर फुटल्याने ही घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या मनमाड व मालेगावचे अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

दुसऱ्या एका घटनेत सप्तशृंगी गड येथे ग्रा.पं. च्या टोलनाक्याजवळ राज्य परिवहन मंडळाच्या एस.टी. बसला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत आगाराची होती. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व ३३ प्रवाशांना खाली उतरवले. यात्रा नियंत्रण समितीने तातडीने तेथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक स्वयंसेवक, विश्वस्त संस्थेचे सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ, रोप-वे कर्मचारी आदी यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करून तातडीने आग आटोक्यात आणली.

तिसऱ्या घटनेमध्ये नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ खासगी बस आणि डम्पर यांच्यात मोठा अपघात झाला. अपघातानंतर या बसला आग लागल्याने १३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. यात जवळपास ३८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस यवतमाळवहून मुंबईला जात होती.