Breaking News

 

 

कोल्हापुरात कचरा विलगीकरण होणार सक्तीचे…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सर्व प्रभागात कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडीसारखे उपक्रम राबवले जात आहे. नागरिकांकडूनही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ओला आणि सुका कचरा वेगळा केला जात नाही. त्यामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेने कचऱ्याचे विलगीकरण सक्तीचे करण्याचे ठरवले आहे.

घराघरातील कचऱ्याचे विलगीकरण करणे आता सक्तीचे करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून उद्यापासून कसबा बावडा परिसरात घराघरात जाऊन याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. संपूर्ण शहरात कचरा विलगीकरणाबाबत प्रबोधन झाल्यावर प्रत्येकावर सक्ती केली जाणार आहे. कचरा विलगीकरण न करणाऱ्यास दोनशे रुपये दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक घंटागाडीबरोबर आरोग्य निरीक्षक असणार आहे. त्यांच्यामार्फत प्रबोधन केले जाणार असून घनकचरा २०१६ या नियमानुसार कचरा उत्पादकांनीच त्याचे विलगीकरण करणे अपेक्षित आहे. तसे न करणाऱ्यास नियमात दंडाची तरतूद आहे.

काही दिवसांपासून शहरातील हॉटेल चालकांचे प्रबोधन करूनही काही जण कचऱ्याचे विलगीकरण न करता तसाच कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना आज (गुरुवार) प्रत्येकी २०० रुपये दंड करण्यात आला. कचर्‍यावर आधारित महापालिकेचा ३० टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यासाठी कचऱ्याचे विलगीकरण होणे आवश्यक आहे. कचरा एकत्रित टाकल्यास तो वेगळा करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जादा परिश्रम घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अगोदर प्रबोधन आणि त्यानंतर सक्ती असा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी आज ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना दिली.

614 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *