कुरुंदवाड (प्रतिनिधी) : सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरु आहे; मात्र शासकीय पातळीवर त्याच्या हालचाली सुरू नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही, अथवा त्यांनी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही, अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशारा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटक शासनाच्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या भूमिकेबाबत आपण लवकरच भेट घेऊन चर्चा करणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आपण प्रखर विरोध करू, अशी माहिती यड्रावकर यांनी दिली.

सातत्याने येणाऱ्या महापुरामुळे सन २००५ पासून शिरोळ तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी पाहता अलमट्टीच्या उंचीबाबत आपला विरोध कायम राहील, असेही आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.

अलमट्टी धरण बांधल्यापासून २००५ मध्ये पहिला महापूर आला. कर्नाटक शासनाने अलमट्टीमुळे पूर येत नाही, असा कागदोपत्री दावा केला असला तरी याचा पुन्हा सर्व्हे होणे गरजेचे आहे. सध्या अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळेच आपल्याकडे दहा ते पंधरा दिवस पाणी तुंबून राहते. सन २०१९  आणि २०२१ या महापुराची स्थिती पाहिल्यास सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, यामध्ये शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले आहे.

कर्नाटकच्या या निर्णयाने त्यांच्या राज्यातील सुमारे ६२ गावांना लाभ होईल, असा दावा करण्यात येत असला तरी सांगली आणि कोल्हापुरातील ३० मोठी गावे व सुमारे ११० लहान गावे कायमची विस्थापित होऊ शकतात. सांगली महापालिकेच्या आठ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ५ लाख नागरिक कायमचे विस्थापित होऊ शकतात. लाखो हेक्टरमधील बागायती शेतीचे क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी १२ ते १५ फुटांच्या आसपास असते. मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत हीच पाणीपातळी ३५ ते ४० फुटांपर्यंत जाते आणि अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला नाही तर ही पातळी ६० फुटांपर्यंत जाऊन पोहोचते.

कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ साली आलेला महापूर हा सर्वाधिक मोठा ठरला. २०२१ आलेल्या महापुरामुळे तुलनेने तितकेच नुकसान झाले. या महापुरात शिरोळ तालुक्यातील अनेक घरे जमीनदोस्त झाली. प्रत्येक महापुराच्या वेळी शासनाकडून पूरग्रस्तांना मदत होत असते, पण नुकसान इतके असते की पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहताना यातना सोसाव्या लागतात. त्यामुळे महापुराला कारणीभूत ठरत असलेल्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास राज्य शासनाच्या वतीने विरोध करुन शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्तांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.