मुंबई (प्रतिनिधी) : बुधवारी मुंबईत झालेल्या दोन्ही मेळाव्यात एक समान अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट घडली, ती म्हणजे व्यासपीठावर ठेवलेली रिकामी खुर्ची. ज्या मैदानांवर बाळासाहेबांनी अनेक वर्षे एकच नेता, एकच मैदान असे दसरा मेळाव्या विचारांचे सोने वाटले, त्याच मेळाव्यात बाळासाहेबांचे आसन अर्थात खुर्ची न ठेवता संजय राऊत यांची खुर्ची ठेवल्याने एकप्रकारे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

शिवाजी पार्कवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची, तर बीकेसीत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची ठेवली होती. शिवसेना आपलीच आहे असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी व्यासपीठावर रिकामी खुर्ची ठेवून एक प्रकारे ही शिवसेना बाळासाहेबांची असल्याचे दाखवून दिले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात संजय राऊत यांची खुर्ची ठेवून बाळासाहेबांऐवजी आपल्याला सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारा संजय राऊत प्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपल्या मेळाव्यात बाळासाहेबांच्या नावाची खुर्ची ठेवून एक प्रकारे शिवसैनिकांच्या हृदयात आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

शिवसेनेचा परंपरागत मेळावा शिवतीर्थावर होत असे. यंदा शिवसेनेचे दोन तुकडे झाल्यानंतर शिवसेना आपलीच आहे असा दावा करत दोन्ही गटांनीही दसरा मेळावा आयोजित केला आहे. उध्दव गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजीपार्कवर, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात पार पडला. या दोन्ही गटांच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर दोन खुर्ची रिकाम्या ठेवल्या होत्या. त्यात परंपरागत असलेल्या शिवसेनेच्या अर्थात उध्दव गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात गोरेगाव नेस्कोतील गटप्रमुखांच्या मेळाव्याप्रमाणे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.

नेस्को येथील गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांची खुर्ची ठेवल्याने शिवसैनिकांमध्ये तेवढी नाराजी नव्हती; परंतु याच मेळाव्यातून बोध घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाच्या बीकेसीवरील मेळाव्यात हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची रिकामी ठेवून त्यावर चाफा हार ठेवत त्यांच्या आशीर्वादाने हा मेळावा होत असल्याचे शिवसैनिकांमध्ये मनामध्ये बिंबवले. विशेष म्हणजे या खुर्चीच्या मागे बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंग थापा हे उभे असल्याने एकप्रकारे बाळासाहेबांच्या आठवणीही जाग्या झाल्या होत्या. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मरण आणि आशीर्वाद घेऊनच हा मेळावा होत असल्याने कुठे तरी शिवसैनिकांच्या मनामध्ये शिवसैनिकांना अभिप्रेत असणारी शिवसेना ही शिंदे गटाकडे असल्याची भावना निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे बाळासाहेबांची खुर्ची रिकामी ठेवून एकप्रकारे जे उध्दव ठाकरे यांना जमले नाही ते शिंदे यांनी करून दाखवले असाच काहीसा सूर शिवसैनिकांमधून ऐकायला मिळत आहे.