बँकॉक: थायलंडमध्ये एका प्री-स्कूलमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त असून त्यात २२ मुलांसह ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने प्री-स्कूल चाइल्ड डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार केला.

थायलंडच्या उत्तर पूर्व भागातील बुआ लाम्फू येथे झालेल्या या घटनेनंतर गोळीबार करणारा फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेल्यामध्ये मुलांचा आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. गोळीबार करणाऱ्याने चाकूने देखील हल्ला केल्याचे समजते. गोळीबार नेमका कशासाठी केला हे अद्याप समजू शकले नाही.

राष्ट्रीय पोलिस प्रवक्ता अचयों क्रॅथोंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोंग बुआ लाम्फू प्रांतात घडली आहे. या घटनेत किमान ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे क्रॅथोंग यांनी सांगितले. सरकारी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी सर्व तपास यंत्रणांना संबंधित हल्लोखोराचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३४ वर्षीय पन्या कामराब नामक व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हल्लेखोराला मादक पदार्थांच्या तस्करीत हात होता. त्यामुळे त्याची पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आली होती. या माथेफिरू माजी पोलीस कर्मचाऱ्याने दुपारच्यावेळी पाळणाघरात बेछुट गोळीबार केला. इतकेच नाही, तर आपल्याजवळील चाकूनेही हल्ला केला. यात अनेक चिमुरड्या मुलांचा गोळी लागून किंवा चाकून भोसकल्याने मृत्यू झाला.

इतर देशांच्या तुलनेत थायलंडमध्ये परवानाधारक बंदुकधारकांची संख्या जास्त असतानाही अशा प्रकारे गोळीबाराच्या घटना खूप कमी वेळा घडल्या आहेत; पण या बेकायदा शत्र वापरणे येथे सर्वसामान्य बाब आहे. यापूर्वी सन २०२० मध्येही असाच गोळीबार झाला होता. यामध्ये संतापलेल्या सैनिकानं अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला होता.