Breaking News

 

 

कोल्हापूरात शांततेत ७०.५० टक्के इतके मतदान : सतिश धुमाळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदार संघातील एकुण ३६ लाख ४६ हजार ९०८ मतदारांपैकी २५ लाख ७० हजार ९७१ म्हणजे ७०.५० टक्के इतके मतदान झाले. यामध्ये कोल्हापूर मतदारसंघात १८ लाख ७४ हजार ३४५ पैकी १३ लाख २५ हजार १७४ इतके तर हातकणंगले मतदारसंघात १७ लाख ७२ हजार ५६३ पैकी १२ लाख ४५ हजार ७९७ इतके मतदान झाले आहे. तसेच जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडल्याची माहिती, उप निवडणूक अधिकारी सतिश धुमाळ यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

धुमाळ म्हणाले, जिल्ह्यातील ४,००४ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली. सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असली तरी या वेळेपर्यंत रांगेत असलेल्यांना मतदान करायला देण्यात आले. यामुळे काही मतदार मतदान केंद्रावर सायंकाळी साडेसहा पर्यत मतदान सुरु राहिले. त्यानंतर मतदान यंत्रे सील करुन ती मतदान केंद्रातून कोल्हापूरातील रमणमळा धान्य गोदाम व राजाराम तलावाजवळील गोदामापर्यंत जीपीएस सिस्टीम असलेल्या वाहनातून चोख बंदोबस्तात आणण्यात आली.

ही मतदान यंत्रे जमा करुन घेण्याचे काम पहाटेपर्यंत सुरुच होते. कोल्हापूर मतदार संघात प्रत्यक्ष मतदान सुरु झाल्यानंतर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने एकुण ३२ मतदान यंत्रे, ३२ कंट्रोल युनिट आणि १७५ व्हीव्हीपीएटी मशिन्स तातडीने बदलण्यात आली. यामुळे संबंधीत मतदान केंद्रावर काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती ती त्वरीत सुरु झाली. जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ७५.९४ टक्के मतदान झाले. चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे ६५.८२ टक्के इतके मतदान झाले.

393 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग