शिरोळ (प्रतिनिधी) : येथील शिवाजी तख्त येथून शिवकालीन ऐतिहासिक जय भवानी तोफ ही फुलांनी सजवून शहरातील मुख्य रस्त्यावरून वाद्याच्या गजरात व दोन बैल जोडीच्या साह्याने दसरा चौक येथे आणण्यात आली. येथे शिवकालीन जय भवानी तोफेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते तोफेच्या फैरी उडवण्यात आल्या. या नंतर येथील ग्रामस्थांकडून सोने लुटण्यात आले. शिरोळ येथील ऐतिहासिक दसरा उत्सव उत्साहात पार पडला.

दसरा चौकातून शिवकालीन जय भवानी तोफ गावातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत शिरोळचे ग्रामदैवत बुवाफन मंदिर येथे आणण्यात आली. बुवाफन मंदिराच्या पटांगणावर शिवकालीन जय भवानी तोफेच्या मानाच्या दोन फैरी मान्यवरांच्या हस्ते उडवण्यात आल्या. हा ऐतिहासिक उत्सव पाहण्यासाठी शहरातील लहान मुलासह, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष कमलाताई शिंदे, नगरसेविका, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी गावातील मंदिरामध्ये सोने वाहून ग्रामस्थांनी मित्र, नातेवाईक यांनी एकमेकांना सोने देऊन ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ अशा दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.