तुळजापूर : श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजापूर येथे आज पहाटे तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे विधीवत पूजा व आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीच्या पालखीचा विसावा घेऊन पुन्हा आरती करण्यात आली.

मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपारिक पध्दतीने मंत्रोच्चार, आई राजा उदो उदोचा जयघोष आणि संबळाच्या साथीने सर्व विधी करण्यात आले. तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपले सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवीची पौर्णिमेपर्यंत श्रम निद्रा सुरू झाली. यावेळी देवीच्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून १०८ साडया परिधान करण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीजींची पालखी तोडून पालखीचे होमात विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कुंकू व फुलांची उधळण करत आई राजा उदो-उदोचा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला.