मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील दोन ठिकाणी इतिहासात प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. गेली अनेक वर्ष दादरच्या शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे म्हटले. त्यामुळे मुंबई यंदा शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी सध्या गर्दी जमवण्यासाठी हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग करण्यात आले आहे.

यंदा मुंबईत उद्या होणारे दसरा मेळावे दणक्यात होणार आहेत. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. बीकेसी पार्कवरील शिंदे गटाच्या मेळाव्यात अयोध्येचे महंत उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दसरा मेळावे जोरदार करण्याचा ठाकरे आणि शिंदे गटानेही चंग बांधला आहे. दोन्ही सभा ठिकाणी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आता एकीकडे खरी शिवसेना कोणाची, याचा वाद सुरू आहे. पक्षचिन्हावर निवडणूक आयोग लवकरच सुनावणी घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना म्हणणे मांडण्याची उद्यापर्यंतची मुदत दिली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वस्व पणाला लावले आहे. जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी ठिकठिकाणाहून शेकडो गाड्या बुक केल्या आहेत.

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात यंदा उद्धव ठाकरे बोलणार आहेत. सोबतच आदित्य ठाकरे यांचे विशेष आकर्षण राहणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य यांनी मोठ्या खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांच्या वक्तृत्वालाही या काळात धार चढली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरची लढाई दोन पातळीवर लढवली जात आहे. एक तर खरे हिंदुत्व कोणाचे आणि त्यातही खरी शिवसेना कोणाची? शिवसेनेचा कणा हिंदुत्व असल्यामुळे माझे हिंदुत्व श्रेष्ठ की तुझे याची चढाओढही या दोघांमध्ये लागली आहे. त्यामुळेच शिंदे यांनी अयोध्येच्या महंतांना बोलावण्याची तयारी केल्याचे समजते.

शिंदे सेनेकडून बीकेसीवर होणाऱ्या मेळाव्यासाठी हजारो बस बुक करण्यात आल्या आहेत. आजपासूनच हे कार्यकर्ते मुंबईत कूच करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाकरेंचेही हजारो कार्यकर्ते मुंबईत धडकणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत अभूतपूर्व गर्दी उसळणार आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.