Breaking News

 

 

जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघात चुरशीने मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवार) कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. कोल्हापूर मतदारसंघात राज्यात सर्वाधिक ६६ टक्के तर हातकणंगले मतदारसंघात टक्के मतदान झाले होते. किरकोळ शाब्दिक चकमक आणि  काही मोजक्या ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूकीसाठी काल दुपारपासूनच निवडणूक यंत्रणा सज्ज होती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्रासह अन्य सुविधा तसेच कर्मचारी पुरवण्यात आले होते. काल रात्रीपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. पहाटे फिरायला बाहेर पड़लेल्या अनेक वयोवृद्ध मतदारांसह तरुण मतदार थेट मतदान केंद्रावरच आले. त्यांनी पहिल्या टप्प्यातच मतदान केले. सकाळी दहा वाजेपर्यत बहुतेक मतदान केंद्रावर सरासरी १६ टक्के मतदान झाले होते.

मतदान केंद्रावर रँम्प, व्हिल चेअर्स यांची सुविधा उपलब्ध करुऩ देण्यात आली होती. तसेच मतदान केंद्राबाहेर वैद्यकीय सुविधाही देण्यात आली होती. मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी तसेच मतदान केंद्राबाबत माहिती देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज होते. दुपारी १२ वाजेपर्यंत उपनगरांमध्ये तसेच शहरातील काही मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे चित्र होते. दुपारी १२ वाजल्यानंतर मात्र मतदान केंद्रावरील गर्दी कमी होवू लागली. त्यामुळे मतदानाचा वेग मंदावला. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५४ टक्क्यांपर्यंतच राहिली.

मतदान केंद्राच्या बाहेर २०० मीटर अंतर सोडून कार्यकर्त्यांना बूथ उभारण्यासाठी परवानगी दिली. काही ठिकाणी घातलेले मंडप पोलिसांनी काढण्यास भाग पाडले. दुचाकी चारचाकी वाहनेही २०० मीटर अंतराच्या बाहेर थांबवण्यात येत होती. वयोवृद्ध, अपंग यांना घेऊन येणाऱ्या वाहनांना मात्र केंद्रापर्यत जाण्यास परवानगी देण्यात आली होती. दुपारी २ ते ४ या वेळेत मतदानाचा वेग अत्यंत कमी होता.

प्रतिभानगर परिसरात वि.स.खांडेकर विद्यामंदीर व अन्य ठिकाणी मतदारांची गर्दी कमी दिसत होती. यादवनगर येथील मतदान केंद्रावर मात्र रांग लागल्याचे चित्र दिसत होते. राजेंद्रनगर परिसरातील सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदीरमध्ये यावेळी मतदारांची गर्दी दिसत नव्हती. यापूर्वी या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसत होत्या.

राजारामपुरी परिसरातील सर्वच मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना उडाण फाऊंडेशनच्या वतीने चपाती, भाजीची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावर जाऊन उडाणचे कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना चपाती, भाजी देत होते. दुपारी बोंद्रेनगर आणि प्रायव्हेट हायस्कूलमधील मतदान यंत्र काही काळ बंद पडले. ही दोन्ही यंत्रे बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. सकाऴपासून सर्वच मतदान केंद्राना वरिष्ठ पोलीस अधिकारी भेटी देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली.

जिल्ह्यातील उमेदवारांसह अनेक दिग्गजांनी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. बहुतेक सर्वांनीच मतदानासाठी रांगेतूनच जाणे पसंत केले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तपोवन येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदान केले. आ. सतेज पाटील, सौ. प्रतिमा पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी एकत्र जाऊन मतदान केले. आ. राजेश क्षीरसागर यांनीही सहकुटुंब मतदान केले. खा. धनंजय महाडिक यांनीही आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.

882 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश