मुरगूड (प्रतिनिधी) : देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली तरीही धनगरवाड्यावर मूलभूत सुविधा पोहोचलेल्याच नाहीत. आजही अनेक धनगरवाड्याच्या चारही बाजूने जंगलाने वेढलेले आहे. कित्येक वर्षांपासून असलेल्या धनगरवाड्यावर यांना आजही सुविधा पोहोचलेल्याच नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वाटले होते की, खरंच आपल्याला सर्व सोयी सुविधा मिळतील; मात्र ते स्वप्नच राहिले. जंगलासाठी केलेला इंग्रजांचा जुलमी कायदा देश स्वतंत्र झाल्यानंतरही तो तसाच राहिला. जंगलात असलेले धनगरवाडे आजही वन खात्याच्या पारतंत्र्यातच आहेत.

या धनगरवाड्यावर वनखात्याचीच अरेरावी चालते. रस्ता नाही, तसेच अन्य कोणत्याही सुविधा नाहीत. वनखाते जंगलात झाडे तोडून देत नाहीत किंवा चुलीसाठी वाळलेली लाकडेही गोळा करून देत नाहीत. शासनाने रॉकेल पुरवठा बंद केला आहे आणि उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळालेले नाही. अठराविश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धनगरवाडे वनखात्याच्या कैदेत अडकून पडलेले आहेत. या धनगरवाड्यावर स्वातंत्र्याचा दिवस उगवणार की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगरवाडा येथे धुळोबा बाबू डोईफोडे यांना अचानक उलटी जुलाब सुरू झाले. त्यांचे वय ९० असल्याने त्यांना चालता येत नाही. रस्ता नाही म्हणून बुजवडे धनगरवाड्यावरील बांधवांनी धुळोबा  डोईफोडे यांना घोंगड्याची झोळी करून दवाखान्यात पाच किलोमीटर पायी चालत चालत घेऊन गेले. शासनाने धनगरवाड्यापर्यंत मूलभूत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.