कागल (प्रतिनिधी) : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. ते कारखान्याच्या आठव्या गळीताच्या बॉयलर अग्नीप्रदीपन आणि इथेनॉल निर्मितीच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. तर कारखान्याचे संस्थापक आणि माजी ग्रामविकास मंत्री आ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ११ ऑक्टोबरला कारखान्याच्या आठव्या हंगामाचा गळीत शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नावीद मुश्रीफ म्हणाले की, नऊ लाख टन ऊस गाळपासह या हंगामात सहवीज प्रकल्पातून नऊ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्याचा संकल्प आहे. इथेनॉल प्रकल्पामध्ये एक कोटी पंचवीस लाख लिटर्स निर्यातीचा संकल्प आहे. कारखान्याचे संस्थापक आ. हसन मुश्रीफ यांनी कारखान्याची विस्तारवाढ गाळप क्षमता दहा हजार मेट्रिक टन, ५० मेगावॅट सहवीज प्रकल्प व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती याप्रमाणे करण्याचा मनोदय यापूर्वीच व्यक्त केला आहे.

त्याप्रमाणे हे काम प्रगतीपथावर आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी, तोडणी-वाहतुकीची बिले, सभासद साखर वेळेवर देण्याची परंपरा ठेवली असून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक सवलतीच्या योजनाही कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना जादा ऊस उत्पादनाबाबत सातत्याने मार्गदर्शन व ऊस विकासाच्या विविध योजनाही राबविल्या जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.