हातकणंगले (प्रतिनिधी) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यातंर्गत महावितरणने हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा व पथदिव्यांचे वीज बिलात बचत व्हावी, या हेतूने कार्यक्षम वीज वापराचे प्रशिक्षण दिले. जिल्हा परिषद व महावितरणचा हा संयुक्त उपक्रम आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.

हातकणंगले पंचायत समितीच्या शाहू सभागृहात झालेल्या प्रशिक्षण सत्रास गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील ४० ग्रामविकास अधिकारी व सर्व विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. वीज बिल बचतीसाठी कपॅसिटरचा वापर करणे, पथदिव्यांसाठी ॲटोस्विच, सेन्सर बसविणे, विद्युत सुरक्षेसाठी रेसिड्युल करंट सर्किट ब्रेकर बसविणे, वीज देयकाची माहिती, महावितरणच्या ऑनलाइन सेवा सुविधांची माहिती प्रशिक्षणात देण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या विद्युत विषयक शंकांचे समाधान करण्यात आले. यापुढील काळात ग्रामसभेत विद्युत विषयक प्रबोधनासाठी स्थानिक अभियंते उपस्थित असतील.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण (भाप्रसे) यांनी या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले आहे. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महावितरणच्या सांगली व कोल्हापूर प्रशिक्षण केंद्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरी ताम्हणकर, उपकार्यकारी अभियंता रत्नाकर मोहिते, सहायक अभियंता आण्णासो आंबवडे यांनी मार्गदर्शन केले.