नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला आहे. नवे इंधन दर जारी झाले असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आजपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत घट झाली असून,१९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मुंबईमध्ये ३२.५० रुपये, दिल्लीमध्ये २५.५० रुपये, कोलकातामध्ये ३६.६  रुपये तर चेन्नईमध्ये ३५.५ रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरचा दर १८११.५० रुपये किमतीला मिळेल. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर त्याच दरात मिळतील.

मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर २३५४ रुपयांपर्यंत पोहोचले होता. मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडरचा दर १८११.५० रुपये इतका असेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर २५.५०  रुपयांनी कमी झाल्याने १८५९.५० रुपये किमतीला असेल. कोलकातामध्ये गॅस सिलिंडरचा दर १९५९ रुपये तर चेन्नईमध्ये २००९ रुपये झाला आहे.

जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर ८.५७  प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी ६.१ प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट होता