कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकपासून २०० मीटर परिसरात खासगी ट्रॅव्हल्सना मनाई करणारा उच्च न्यायालयाचा आदेश, शासनाचा जीआर आणि परिवहन विभागाकडील परिपत्रकाच्या आधारे शहर वाहतूक शाखेने कोल्हापूरमध्ये खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसना हॉटेल पंचशीलपासून पुढे येण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटला आहे.

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत होती. ट्रॅव्हल्सच्या बेशिस्त पार्किंगमुळे बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, ताराराणी सिग्नल या परिसरात वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत होती. याचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. एस.टी.च्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत होता. पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी आणि त्यांच्या पथकाने खासगी ट्रॅव्हल्सविरोधात एक क्रांतिकारक मोहीम उघडली.

या कारवाईमुळे सामान्य नागरिक, खासगी व्यावसायिक, रहिवाशांनी शहर वाहतूक शाखेचे अभिनंदन करून आभार मानले आहेत. बऱ्याच नागरिकांनी प्रत्यक्षात शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन पोलिसांचे अभिनंदन केले आहे.