कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री सोसायटी या संस्थेची घोडदौड प्रगतिपथावर आहे. या संघामार्फत उत्कृष्ट दर्जाचे रासायनिक व सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सभासदांना वाजवी दरात पुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते कागल येथे संघाच्या ४० व्या वार्षिक सभेत बोलत होते.

ते म्हणाले, सभासद, शेतकऱ्यांना चांगली सेवा देणेच्या हेतूने शाहू कारखान्यामार्फत निर्माण केले जाणारे ‘शाहू पोटॅश व सेंद्रिय खते शाहू कृषी संघाच्या शाखेमार्फत वितरित करण्यात येणार आहेत. खत विक्रीचे टार्गेट १५ कोटींपर्यंत वाढविण्याचा व त्यासाठी आवश्यक तेथे संघाच्या शाखा वाढविण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे.

अध्यक्षीय भाषणात संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या संकल्पनेतून संघामार्फत सुरू केलेला कागल बाजार चांगला चालला असून, तो नफ्यात आला आहे. संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने या चांगल्या सूचनेबद्दल घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.

विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. सर्व विषयास सभासदांनी मंजुरी दिली. स्वागत व श्रद्धांजली वाचन उपाध्यक्ष अरुण शिंत्रे यांनी केले. संचालक रामचंद्र वैराट यांनी आभार मानले. सभेस सर्व संचालक, शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.